Thursday 14 February 2019

Homage to Vishnu Wagh



विष्णू सुर्या वाघ यांनी केलेल्या मरणापूर्वीच्या काही सूचना

विशाल अभंग

१४ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

कवी विष्णू सुर्या वाघ गेले. ते वाघासारखेच आपल्या मस्तीत जगले. गेली जवळपास अडीच वर्षं त्याच मस्तीत मृत्यूशी झुंज देत होते. त्यांचं जाणं फार अनपेक्षित नव्हतं, तरीही त्यांच्या लाखो चाहत्यांना त्यांचं जाणं चटका लावून जाणारंच होतं. त्यांच्या एका कवितेत त्यांनी त्यांची शेवटची इच्छा व्यक्त केलीय. ती एका अफाट माणसाची बेफाम कविता म्हणूनही वाचायलाच हवी.

विष्णू सुर्या वाघ गेली अडीच वर्षांपूर्वी मृत्यूचा उंबरठा पार करून पुन्हा परत आले होते. तेव्हापासून ते व्हिलचेअरवर होते. मृत्यूशी झुंज देत होते. कधी पणजी, कधी दिल्ली, कधी मुंबई, हॉस्पिटलच्या वाऱ्या सुरू होत्या. मृत्यूशी पाठशिवणीचा खेळ सुरू होता त्यांचा. पण जगण्यावरच्या प्रचंड प्रेमामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू काही संपत नव्हतं.

पणजीच्या दोना पावल इथल्या मणिपाल हॉस्पिटलमधे ते गेली दोनेक महिने होते. आजारपण बळावत होतं.त्यांना याही परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेत जायचं होतं. जोहान्सबर्गला, केप टाऊनला भेट द्यायची होती. त्यांच्या पत्नी अरुणा वाघांनी त्यांची तीही इच्छा पूर्ण केली. तिथेच वयाच्या फक्त ५३व्या वर्षी या अफाट प्रतिभेचा धनी असणाऱ्या कवीने शेवटचा श्वास घेतला.

विष्णूना हॉस्पिटलच्या चार भिंतीत मरायचंच नव्हतं. कोणत्याही भिंती त्यांना रोखूच शकणार नव्हत्या. `सुशेगाद` या त्यांच्या प्रसिद्ध काव्यसंग्रहात त्यांची एक कविता आहे, `मरण्यापूर्वीच्या काही सूचना` म्हणून. त्यात त्यांचं मनसोक्त जगण्याविषयीचं प्रेम शब्दाशब्दांतून व्यक्त झालंय. विष्णू सुर्या वाघ गेल्यानंतर आता खूप काही लिहून येईल त्यांच्याविषयी. पण ते काय रसायन होतं, हे समजून घ्यायचं असेल, तर वाचावीच लागेल अशी ही कविता

मरण्यापूर्वीच्या काही सूचना
सर्वप्रथम मला शिफ्ट करा दुसऱ्या हॉस्पिटलात
असं हॉस्पिटल –
जिथं स्मशानवत शांतता असणार नाही
जिथं औषधांचा वास येणार नाही
जिथं डॉक्टरांच्या चेहऱ्याला इस्त्री नसेल
आणि नर्सचं हसणंही रोबोटीक नसेल

हॉस्पिटलाच्या भिंतीना
मुळीच असून ये पांढरा रंग
बोलावून घ्या आशू आपटे अन् त्याच्या गँगला
घ्या चितारून मोलेचं घनदाट जंगल
मधूनच डुरकावताना दिसू दे एखादा गवा
किंवा या झाडावरून त्या झाडावर झेपावणारं
मातकट रंगाचं शेकरू

सुतकी भावनांचे मुखवटे घालून
हॉस्पिटलात येऊच नये नातेवाईंकांनी
किंबहुना नातेवाईकांना कळवूनच नका
एंट्री द्या फक्त मित्रांना
प्रत्येक विजिटरला हॉस्पिटलच्या खर्चाने
दारू मिळेल अशी व्यवस्था करा
उदबत्त्याविदबत्त्या नकाच लावू
प्रत्येकाला ओढायला लावा सिगारेट
मला द्या चार पाच झउरके
वॉर्डभर करा इतका धूर
की मृत्यूलाही
काही क्षण समोरचं काहीच दिसू नये

सक्तीची रजा देऊन
घरी पाठवा सर्व नर्सींना
जुन्या नव्या सर्व प्रेयसींना सांगावा धाडा
काळजी एवढीच घ्या
की त्यांचं टायमिंग क्लॅश होऊ नये

डॉक्टर म्हणून शक्यतो
कवींनाच ठेवा पूर्णवेळ बिनपगारी
नलेश सलाईनमधून थेंब थेंब निसर्ग पाजील
अरुण म्हणेलः कोसो मैल दूर आहे सर्जरी
केळुसकरने सिरिज टेकवताच झिनझिनाट
संभाच्या शाहिरीने झोपेची वाट
दिनकर म्हणेलः डोंगरीचा पिंपळ झडू लागला
खाटेवर वाघोबाही सडू लागला

सुऱ्या गाईल नदीवरची कविता
नि तरंगवत ठेवील सूरांच्या पाण्यावर
साहेबराव खिशात घालून घेऊन येईल क्वार्टर
फुटाणे म्हणतील लाल रक्त महाग आहे
फमु सांगतीलः देव आणि प्रकृती
यांचं काँबिनेशन असलेला
हा विचित्र वाघ आहे.

कवीच्या ट्रीटमेंटमुळे मी मेलोच
तर अंत्ययात्रेचा सगळा खर्च
सुधाभाईवर घालावा

येऊरला मोठ्ठी पार्टी करावी
माझा मृतदेह मध्ये ठेवून
डॅनिएलनं नॉनस्टॉप जोक्स सांगावे
रजाने नुस्त्या बोटांनीच चित्रं काढावीत अंगभर
सर्वांनी गावं नाचावं हसावं खिदळावं
खावं प्यावं झिंगावं पडावं कोसळावं

मला जाळू नये किंवा पुरू नये
फुलांच्या मुलायम हातांनी भिरकावून द्यावं
आभाळाच्या कॅनवासवर
तिथे आधीच असलेल्या तुकोबाने
हात पुढे करीत मला झेलून घ्यावं
नि एवढंच म्हणावं –
आपण जिवंत आहोत,
विठू कधीच मेला होता!

शेवटच्या पार्टीत झिंगून
प्रत्येकाने जायला निघावं
नि स्वतःच्या घराची वाटच विसरून जावं
मग साऱ्यांनीच
एकमेकांच्या अंगणात
मुक्या शब्दांची नक्षत्रं पेटवावी
काही तुक्यासाठी…
काही माझ्यासाठी!

विष्णू वाघांनी आपल्या आयुष्याचा फार सुंदर काळ ज्यांच्यासोबत घालवला असे सगळेच कवीमित्र या कवितेत आलेत. त्यांच्याइतकं नाही, तरीही मनसोक्त जगणारे. त्यात रामदास फुटाणे, फ. मुं. शिंदे, नलेश पाटील, महेश केळुसकर, साहेबराव ठाणगे, शाहीर संभाजी भगत, अरुण म्हात्रे, दिनकर जोशी अशा त्यांच्या बैठकीतल्या कवींची सोबत त्यांना हवीय. गोव्यातल्या मोलेमधलं जंगल चितारण्यासाठी त्यांना कोकणातले चित्रकार आशुतोष आपटे हवे आहेत. ठाण्यातल्या येऊरला पार्टी देण्यासाठी माजी नगरसेवक सुधाकर चव्हाण आहेत. शिवाय चव्हाणांच्या बैठकीतले डॅनियल जोक सांगायला हवे आहेत. त्यात रजा असा उल्लेख आहे, ते जागतिक कीर्तीचे महान चित्रकार रझा असावेत.

शिवाय संत तुकाराम आहेतच. विष्णू वाघ कवी म्हणून तुकोबांना सोबत घेऊनच लिहित राहिले. त्यांचं एक नाटकच आहे, तुका अभंग अभंग. तुकोबांसारखंच अभंग राहावं, हीच कवी म्हणून त्यांची शेवटची इच्छा असावी. मराठी आणि कोकणी पुढची अनेक वर्षं विष्णूंना विसरू शकणार नाही. त्यांची राजकारणी म्हणून भूषवलेली पदं कुणाच्या लक्षात राहणार नाहीत. पण त्यांची कविता अभंगच राहील. ती कविता आणि त्या कवितेने दिलेली खुद्दारी हीच त्यांची ओळख होती.

No comments:

Post a Comment

Thanks for comment JK