Thursday 27 February 2014

पाहून रंगवण्याऐवजी रंगवून पाहिलं!

खरं म्हणजे, दृश्य प्रवासात पुढे, मागे, वर, खाली असं काही नसतंच. असतो फक्त स्वानुभव, प्रवाशाला समृद्ध करणारा आणि तो मला अनुभवता आला, पळशीकरसरांच्या सान्निध्यात असताना, जीवनात आलेल्या वळणामुळे!.. आयुष्यातल्या वळणाला उजाळा देत आहेत, प्रसिद्ध चित्रकार प्रभाकर कोलते...

वळणं तर आयुष्यात अनेक आली, काही मी स्वत:च घेतली. त्यातल्या काहींनी जीवनाला वळण लावलं तर, काही वळणांना मी माझ्या मनाप्रमाणे आळवलं, वळवलं. काही वळणांनी आकार दिला, अर्थ दिला. परंतु एका अकस्मात वळणाने मला माझ्यातच गुंतवलं. मला माझी ओळख करून दिली. माझीच माझ्याशी भेट घालून दिली, कायमची. 'वळणावर आंब्याचे झाड एक रसाळले' असं म्हणण्यासारखा दृक- रसज्ञतेचा दृष्टांत ह्या संबंधित वळणाने मला दिला, जो उत्तरोत्तर गुणावत गेला आणि मला समाधान देणारा ठरला.

................

जे. जे. कलाशाळेतील अंतिम वर्षातले झपाट्याने सरत जाणारे दिवस. एक पाऊल शाळेत, तर दुसरं बाहेर अशी दुभंगलेली मन:स्थिती. अंतिम परीक्षेपूर्वीची परीक्षा म्हणजे वार्षिक प्रदर्शन, ते तोंडावर आलेले. प्रत्येकाच्या देहबोलीतून बोलणारा आंतरिक तणाव. सगळे गुप्तपणे आपापल्या कला-कर्मात रत. आपल्याच उजव्या हाताचे डाव्या हाताला कळू न देण्याचे प्रत्येकाचे धोरण, मग इतर कोण काय करतो हे कळणे म्हणजे चक्रव्यूह भेदण्यासारखेच!

कोणाला गोल्ड-मेडल मिळणार याचे अंदाज दही-हंडीच्या थरासारखे बांधले जात आणि झपाट्याने कोसळत. माझेही नाव त्या थरात असल्याचं कानावर येई आणि मनात दिवसा उजेडी कारंजी फुटत. मग म्हणता म्हणता वार्षिकोत्सवाचा पहिला दिवस उजाडला.

काशिनाथ साळवेला गोल्ड, मला सिल्वर घोषित झालं. गोल्ड नंतरच्या दु:खापेक्षा ब्राँझ आधीचा आनंद गो(ल)ड मानून घेतला. दिवस उलटत गेले तसतसा आनंदही अस्ताला गेला आणि अस्मादिक पुन्हा सत्यसृष्टीत आले.

मनात विचार आला, काय झालं असतं गोल्ड मिळालं असतं तर आणि काय होणार आहे सिल्वर मिळालं म्हणून! आतून उत्तर येण्याइतकं शहाणपण तेव्हा आलं नव्हतं, म्हणून मग गप्प राहून जे समोर येईल ते स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मला न शोभणारा संयम माझ्यात कुठून आला कोण जाणे? कुठून का होईना, पण तो आला. मी चक्क निर्ढावलो आणि शांत झालो.
( Work on display. Images for illustrative purposes only)


साळवे आणि मी घनिष्ट मित्र होतो. त्यामुळे एकमेकाला हसत-खेळत सामोरे जात पदरी पडलेलं यश आम्ही पचवलं.

...आणि ते, आयुष्याला सुखाने उल्हसित करणारं, दु:खाने गुदमरवून टाकणारं, भविष्यातल्या आव्हानांनी चेतवणारं आणि भूतकाळातल्या वेदनांनी चित्कारायला लावणारं वळण अंगावर आलं. कसलीही आगाऊ सूचना न देता.

ज्या दिवशी मी शाळेत गेलो नव्हतो, त्याच दिवशी केमोल्ड गॅलरीचे केकू गांधी प्रदर्शन पाहायला आले. त्यांनी माझं पेंटिग विकत घेतलं. वार्षिक प्रदर्शनातून चित्र विकलं जाण्याची ही पहिलीच घटना असं म्हटलं गेलं. तशी ती असो-नसो, माझ्या खिशात पैसे पडणार होते; हे तेव्हाच्या परिस्थितीत फार महत्वाचं होतं माझ्यासाठी. परंतु ह्या घटनेचा मला मागमूसही नव्हता. दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो. मित्रांनी कल्लोळ केला, 'पार्टी दे, तुझं चित्र विकलं गेलं.' मला खरंच वाटेना. वाटलं मित्र थट्टा करताहेत. तर म्हणाले- 'पळशीकरसरांना विचार.' गेलो सरांकडे. त्यांनीही तेच सांगितलं. तरीही खरं वाटेना. मनात आलं, सरही ह्या थट्टेत सामील झाले असावेत. म्हणाले- 'अरे केकुने तुला गॅलरीत बोलावलं आहे, जा, जाऊन ये.' गंभीर प्रकृतीचे सर अशी थट्टा करणं अशक्य अशी मनाची समजूत काढत केकूना भेटायला त्यांच्या गॅलरीत गेलो.

फेब्रुवारी, सन १९६८. दुपारचे तीन वाजले होते. केकू त्यांच्या खुर्चीत, मी त्यांच्यासमोर उभा. माझी ओळख दिली. त्यांनी लगेच २५० रुपयांचा चेक माझ्या हातात देताच मी दिवास्वप्नात विरघळत गेलो. सिल्वर मेडलचं विष अमृत होऊन अंगभर पसरलं. मी ढगात होतो. खाली उतरायची बिलकूल इच्छा नव्हती. तेवढ्यात केकूंचा आवाज कानी पडला- 'कोलते, वुई वुड लाइक टू शो युवर वर्क इन अवर गॅलरी, इन कमिंग मंथ ऑफ मे, विल यू बी इंटरेस्टेड?'

चित्रकार मागतो एक डोळा, गॅलरी देते दोन. चेक, वर एक्झिबिशन! अशी माझी गत झाली. काय उत्तर द्यावं कळेना. म्हटलं, विचार करून सांगतो आणि तिथून बाहेर पडलो. तडक सरांकडे निघालो.

वर्षभरापूर्वी नाटकात काम करण्याच्या, तसंच इतर कलांमध्ये भाग घेण्याच्या माझ्या अतिउत्साहावर कठोर शब्दांत टीका करत सरांनी मला केवळ पेंटिंगच्या दिशेने वळवलं होतं. त्यावेळच्या त्यांच्या निखळ स्पष्टवक्तेपणाचा अनुभव स्मरणात कायम ताजा राहील असाच होता. आणि आता त्यांना अपेक्षित असलेल्या दिशेनेच इतक्या वेगाने व्यावसायिक यश, न मागता, कुठलेही प्रयत्न न करता हाताशी आल्याने मी त्यांच्या दूरदृष्टीचं मनात मनसोक्त कौतुक करत, परत पाऊली शाळेच्या दिशेने निघालो.

सर स्टाफ-रूममध्ये पुस्तक वाचत बसले होते. त्यांना पाहताच माझ्या उत्साहाला निराशेपूर्वीचं उधाण आलं असावं. मी आयुष्यात पहिल्यांदा त्यांच्या पायांना स्पर्श करून त्यांना नमस्कार केला आणि एका दमात केकू-भेटीचा वृतांत कथन करून त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागलो. माझ्या डोळ्यांतून आतुरता भरभरून ओसंडत होती आणि सरही तितक्याच तीव्रतेने गंभीर होत चाललेले दिसत होते. ते काहीच बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हते आणि मीही त्यांच्याकडून काहीच न ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हतो. मला जाणवलं की हीच माझ्या आयुष्यातली आणीबाणीची आणि महत्वाची वेळ आहे आणि सरांच्या सल्ल्याशिवाय ती निसटून जाऊ द्यायची नाही. अशा स्थितीत किती वेळ गेला कळलंच नाही आणि अचानक मी सराना म्हटलं, 'सर तुमच्या सल्ल्याशिवाय मी कोणताही निर्णय घेणार नाही, तेव्हा प्लीज, मला सांगा मी काय उत्तर देऊ केकूना.' तरीही सर गप्पच. सरांच्या ह्या अकल्पित पॉजमुळे माझ्या मनात शंका-कुशंकांचं मोहोळ उठलं. सराना आनंद झाला नाही का?, की सरांचा माझ्यावरचा राग अजूनही शिल्लक आहे? की केमोल्डसारख्या गॅलराने मला शोची ऑफर दिली, हे सरांना आवडलं नाही? विद्यार्थी दशेत असतानाच कुणाला मिळाली आहे अशी संधी? कुठून अवदसा आठवली आणि सरांना सल्ला विचारायला आलो... असे बरेचसे अरबट चरबट कल्पनांचे खेळ डोक्यात सुरु असतानाच सर जागेवरून उठले आण‌ि म्हणाले- 'प्रभाकर, प्रदर्शन म्हणजे आपल्या प्रतिभेचं दर्शन आणि त्यातही ते पहिलंच असेल तर, ते धाडसापेक्षा जबाबदारीचं काम आहे. 'फस्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन.' तेंव्हा मी काय म्हणतो ते लक्ष देऊन ऐक आणि मग तुझा तू निर्णय घे.'

ते पुढे म्हणाले 'सांग बरं, तुझं चित्र सापडलंय तुला? तुझ्या चित्रांतून तू थोडासा आणि इतरच अधिक दिसतात- सामंत, हुसेन, रझा, पळशीकर, गायतोंडे, पॉल क्ले. तुझ्या चित्रात तू कुठे आणि किती आहेस हे आधी तू जोखावंस आणि मग ठरवावंस. जा, विचार करून निर्णय घे. घाई करू नकोस. चुकीच्या पायावर उभी राहिलेली इमारत कोसळायला वेळ लागत नाही.'

म्हणजे जबाबदारीचं काम थोडंसं हलकं करण्याऐवजी माझा माझ्यातच कडेलोट करून सर निघून गेले, मला एकटं सोडून. मी निराश झालो खरा, पण सरांनी मला विचार करायला भाग पाडलं. माझा पुरता गोंधळ उडाला.

नंतरचे मोजून आठ दिवस शाळेतच गेलो नाही. दररोज माझी सगळी चित्र पोर्टफोलियोतून काढून जमिनीवर मांडायचो. कधी ती उलटी-सुलटी ठेवून, तर कधी एक एक करून पाहायचो. त्यावरल्या प्रभावांचं मनाशी विश्लेषण करायचो. हे असं सातत्याने केल्यामुळे सरांचं म्हणणं हळूहळू मनात रिघायला लागलं. खरंच, चित्र आहेत, पण मी कुठे आहे त्यात, शिवाय किती आहे. कसं ओळखायचं स्वत:ला. काही कळायचं नाही. काय आहेत या शोधाचे निकष, ज्यांचे प्रभाव जाणवतात त्या चित्रकारांची चित्रे त्यांचीच वाटतात, ती कशामुळे इ.इ. प्रश्न मनात यायचे. त्या अथक प्रयासात डोकं, मन, बुद्धी, त्या अलीकडचे आणि पलीकडचे सारे दिगंत बधीर झाले. अत्यंत निराश झालो. हाती काही आलं नसलं तरी आपण चुकीचा मार्ग निवडला आहे, असं चुकूनही वाटलं नाही, ही त्या शोधातली जमेची बाजू. दरम्यान, जे मनापासून आवडतं तेच तू करतो आहेस, असं माझं मन मला सांगत राहिलं. मग त्या आवडीवरच लक्ष केंद्रित करून चिंतन करू लागलो आणि मनात प्रत्यन्तराची वीज चमकून गेली. वाटलं जे माझं होतं, ते माझ्यातच हरवलं होतं आणि मी ते बाहेर शोधत होतो. अभ्यास आणि व्यासंग यांमधील नातं आणि परस्परविरोधी दिशा लक्षात आल्या.

......



बरेच दिवस चित्रासंबंधी काहीच केलं नाही. त्याऐवजी गोनीदांची 'कुणा एकाची भ्रमणगाथा', पु. शि. रेगे यांची 'सावित्री', 'पुष्कळा' ही पुस्तकं वाचली. सिनेमे पाहिले. सोबत संगीत होतंच. मनावर कुठलंही ओझं न घेता मुंबईतच भरपूर प्रवास केला. थोडक्यात चित्र सोडून इतर सर्व काही केलं. आम्ही एक लॉन्ड्री चालवायला घेतली होती. तिथे बसू लागलो. त्यामुळे लोकांशी, कपड्यांशी संपर्क घडला, जो माझ्यासाठी नवा होता. त्यातून माझ्या चित्रात काय येणार होतं, माहीत नव्हतं. सगळं जगणं निश्चित-अनिश्चित नि विक्षिप्त होत चाललं होतं, परंतु मी स्वत:च्या आणि माझ्या चित्राच्या जवळ येत असल्याची आंतरिक जाणीव स्पष्ट होत होती.

ही आनंद व्यक्त करण्याची नव्हे, तर स्वत:ची परीक्षा घेण्याची वेळ होती हे लक्षात आलं आणि मी परीक्षेला बसलो. मीच परीक्षार्थी आणि मीच परीक्षक. शाळेत जे-जे शिकलो त्याचं मर्म लक्षात ठेऊन बाकीचं सर्व स्मृतीतून पुसून टाकण्याचा प्रयत्न चित्रातून जारी ठेवला, कारण तो निव्वळ अभ्यास होता. दिसणं, पाहणं, निरखणं आणि दृष्टीपटलावर बिम्बवणं ह्यातला मुलभूत भेद स्पष्ट करणारा. चित्राचे घटक आणि त्यांचं सृष्टीतल्या अनेकविध रूपांशी असणारं अंतस्थ, अदृश्य नातं सांगणारा. केवळ वरवरची वस्तुनिष्ठ यंत्रवत्, तांत्रिक कारागिरी आणखी सुधारून मला चित्रांतून मांडायची नव्हती. तर त्या अभ्यासाच्या जोरावर मनातल्या दृश्याविषयीच्या अदृश्य विचाराला त्यातल्या निखळ अनुबंधाला उत्स्फूर्तपणे आणि सहजपणे व्यक्त करायचं होतं. आशयाला रूप द्यायचं होतं. अनोळखी अनुभवांना ओळख देण्याची दुर्दम्य इच्छा होती. दृष्टीआड लपलेल्या सृष्टीला साकारणं हाच माझ्या सृजन-क्रियेचा केंद्रबिंदू आहे, हे तीव्रतेनं जाणवत होतं आणि म्हणूनच 'पाहून रंगवण्या ऐवजी, रंगवून पाहण्याची' जिगीषा मी अनुभवू इच्छित होतो. ह्या तीव्र इच्छेनेच मला एका अद्भुत वळणावर आणून उभं केलं होतं.

मला माझं चित्र सापडलं होतं, कारण मला मी सापडलो होतो. १९६८ साली शो-ची ऑफर देणाऱ्या केकूनी मला पुन्हा १९७८ साली विचारलं, त्यावेळीही मी त्यांना नकार दिला. कारण मी माझ्या 'फस्ट इम्प्रेशन' बद्दल अधिक जागरूक आणि जबाबदार झालो होतो. १९८३ साली मात्र मी माझं पहिलंवहिलं प्रदर्शन त्यांच्याच गॅलरीमध्ये भरवलं आणि कलाजगताने त्याचं स्वागत केलं. मला घडविणाऱ्या पळशीकरसरांनीच प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. खरंच माझ्या सरांनी त्या वेळी परखड उपदेश केला नसता, तर मी आज कुठे असतो? त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चाललो नसतो, तर माझ्या वैचारिक प्रवासाचं काय झालं असतं? मला माहीत आहे, मी असूनही नसतोच.

असं हे मूलभूत वळण घेऊन मी आता खूप पुढे निघून आलो आहे. खरं म्हणजे, दृश्य प्रवासात पुढे, मागे, वर, खाली असं काही नसतं. असतो फक्त स्वानुभव, प्रवाशाला समृद्ध करणारा. तो मला अनुभवता आला, सरांच्या सान्निध्यात, जीवनात आलेल्या वळणामुळे! 

(Report courtesy महाराष्ट्र टाइम्स) Feb 2, 2014, 12.00AM