दक्षिण मुंबईस्थित, गॅलरी निप्पोन मध्ये गेले काही दिवस एक प्रदर्शन सुरु होत, आज शनिवारी त्याचा शेवटचा दिवस. प्रदर्शन निलेश किंकळे या चित्रकार, शिल्पकार आणि क्युरेटर( नियोजनकार/नियोजक) यांनी क्युरेट केलं होत. त्यासोबत अर्क आर्ट ट्रस्ट यांचंही सहकार्य या प्रदर्शनाला लाभलं.
प्रदर्शनाचं नाव अगदी वेगळं होतं. “ थुक लगाना मना है “ जाणीवपूर्वक बोलीभाषेतला वाकप्रचार त्यांनी वापरला.
एकेकाळी पोस्टाचे स्टॅम्प/ तिकिटं याला मागच्या बाजूला गोंद लावलेली असे. तिला थोडं ओलं करून पत्रावर, पाकिटावर चिकटवत असत. नोटा एकमेकाला चिकटतात, त्यांनाही मोजताना हळू हळू थुकीचा वापर करणं सुरु झालं. एखादी कृती करण्यासाठी थोडा ओलावा निर्माण करायचा असेल तर मानवाची थुकी/थुक वापरणे हि एक पद्धत रूढ झाली. पण पाण्याच्या किंवा इतर द्रवपदार्थाच्या ऐवजी थुक वापरणे याला अजूनही एक अर्थ प्राप्त झाला. खोट्याचं खरं करणे.
![]() |
| निलेश किंकळे |
पाणी किंवा इतर द्रव पदार्थ या ऐवजी थुक वापरून काम करणे.
कलाक्षेत्रात खोट्याच खरं करणे या अर्थी तो त्यांनी वापरला!!.
कलेमध्ये खोट्याच खरं करणं यालाही अनेक अर्थ आहेत. एक प्रसिद्ध कलाकार, त्याची मौल्यवान कलाकृती याची नकली प्रतिकृती बनवून तिला अस्सल म्हणून विकणे. तसेच एखादा कलाकार हा खूप प्रसिद्ध झाला, त्याच्या कलाकृती अनेकांना ‘विकत घ्यावी’ असा वाटू लागलं, की गम्मत होते. एकतर मागणी जास्त तशी किंमत वाढू लागते आणि त्यामुळे कलाकार किंवा त्याच्या कलाकृतींची विक्री करणारी गॅलरी, दलाल कलाकाराच्या कमी दर्जाच्या कलाकृतीही उच्च दर्जाच्या म्हणून विकतात. नकली बनवून विकतात, विकू शकतात. कलाकारांची एक वैचारिक, ‘सांस्कृतिक मुल्यामध्ये भर घालणारा’ अशी एक प्रतिमा, निर्माण केलेली असते, झालेली असते. त्यावरही त्याच्या कलाकृतीची किंमत ठरते. पण अनेक वेळा, कोणती कलाकृती खरंच मुल्यनिर्मिती करत आहे आणि कोणती करत नाही, सर्वसाधारण दर्जाची आहे ह्याच भान न ठेवता सर्व सामान्य कलाकृतीही,असामान्य,मुल्यवान म्हणून खपवल्या जातात. पिकासो ह्या स्पॅनिश चित्रकाराबाबत असं नक्कीच झाल्याचं आपण मागे वळून पाहताना आढळून येत. कलाव्यवहारातील खऱ्याखोट्याची कलाकाराला पूर्ण कल्पना असते, तो त्याबाबत मौन बाळगून म्हणजे तो त्याच्या कलानिर्मितीच्या प्रामाणिक मुल्याला लवचिक ठेवतो, जेव्हा फायदा असेल तेव्हा तो अप्रामाणिक राहतो आणि इतर वेळी प्रामाणिक असाही अर्थ थुक लावणे याचा निघतो. थुक लावणे = दुसऱ्याला /स्वतःला फसवणे आणि यश मिळवणे.
निलेश किंकळे एका अर्थी सर्व कलाकारांना म्हणतात त्यांनी आयोजलेल्या प्रदर्शनात थुक लावणे, कमी दर्जाचं काही करणे, फसवणे याला वाव नाही.
गॅलरी निप्पोन हि एक छोट्या आकाराची गॅलरी आहे. ती प्रायोगिक कलाकारांसाठी उत्तम आहे असं निलेश मानतात.
गॅलरी निप्पोन ह्या गॅलरीच्या आकारामुळे आणि स्टॅम्प ला थुक लावण्याची, कलेत खोट्याच खरं करणं या सांस्कृतिक सवयी या सगळ्याच मिळून चित्राचा आकार निश्चित झाला. त्यांनी देशोदेशीच्या अनेक कलाकारांना निवडलं,आव्हान केलं कि त्यांनी या प्रदर्शनात भाग घ्यावा. पण त्याकरता त्यांनी पोस्टाच्या स्टॅम्पची, त्याच्या स्वरूपाच्या अडीच इंच x तीन इंच या आकारचे कागद वापरले. ते त्यांनी सर्व कलाकारांना पोस्टाने पाठवले आणि कलाकार कोणत्याही स्वरूपाचं, मध्यमामध्ये काम करत असले तरी त्यांनी या एवढ्या छोट्या कागदवरच काम करून गॅलरीला पोस्टाने , कुरियरने पाठवावे अशी हि योजना होती. एकंदरीत भारतसह १३ देशातील २२० कलाकारांनी याला प्रतिसाद दिला. भारतातील अनेक प्रतिष्ठित, जेष्ठ , तरुण , नवोदित कलाकारांनी यात भाग घेतला.
प्रदर्शन पाहताना एक संवेदनशील अनुभव येतो. छोट्या आकारात कलाकारांनी इतक्या तरल कलाकृती बनवल्या आहेत की रसिक कलाकृतींच्या छोट्या आकाराच्या कोशामध्ये शिरतो. कोशाच्या आत तरल संवेदना, मूक भाष्य, चित्कार, घुसमट, भावनांची अभिव्यक्ती,निरीक्षणं,अश्या अनेक गोष्टी आपण पाहतो. एका अर्थी या छोट्या खिडकी मधून कलाकारही संवाद साधतो. अगदी कानात हळुवार बोलल्यासारखं.एखादा छोटा घास तयार करावा तस!! त्या कृती मध्ये भावनेचं मिश्रण अगदी सहज झालं आहे. हा अनुभव अस्सलतेची खात्री देत. जरी सर्व कलाकृती विक्रीसाठी असल्या तरी या सर्व प्रदर्शनात हे भान येताच नाही. जणूकाही सर्व जण अस्सलपणा, प्रामाणिकपणा, याबाबत एकमेकांना आपल्या भावना कळवतात असा काहीस स्वरूप याला प्राप्त झाल आहे.
कलाकारांनी छोट्या आकारामुळे अगदी लघुचित्रकारच्या, सोनाराच्या नाजूकतेने काम केलं आहे त्याच भान पदोपदी येत. अनेकांनी त्यांच्या नेहमीच्या आकाराला सोडून, माध्यमाला सोडून , आणि तरीही त्रिमित वस्तू चिकटवूनही कलाकृती घडवल्या आहेत. ज्या विस्मय निर्माण करतात. छोट्या आकारात , काहीश्या कमी किमतीमध्ये उपलबद्ध कलाकृती कला संग्राहकांना सुद्धा एक उत्तम संधी देतात.
हे प्रदर्शन अनेक जागी फिरणार आहे, प्रदर्शित होणार आहे. अस्सलपणा , प्रामाणिकपणा आणि तरलता यांचा संदेश सर्व ठिकाणी पसरवणार आहे. हि एका नवीन सुरवात ठरो !!महेंद्र दामले
( चित्रकार, लेखक, कलाशिक्षणतज्ञ )






