Saturday 9 March 2019

'संवेदनांची आवर्तने'

अशोक हिंगे यांच्या चित्रांचे जहांगीर आर्ट गॅलरी - ४ मध्ये प्रदर्शन.
१८ मार्च ते २४ मार्च २०१९.  सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत.

           चित्र अवकाशातील आकार, प्रकाशरंग, पोत, रचना या दृश्यघटकांच्या आधारे दृश्यजाणिवांच्या संवेदनांची आवृत्ती, पुनरावृत्तीच्या दृश्यरूप रचनाबंधाचे अवकाशीय 'स्थिररूप' म्हणजे चित्र. त्या चित्रातील 'संवेदनांची आवर्तने' हे अशोक हिंगे यांच्या चित्ररूप दृश्यभाषेचे सकृतदर्शन होय. तथाकथित कलाशिक्षणाचा भाग अशोक यांनी अभ्यासला असून रेषा, आकार, रंग पोत या आधारे चित्र रचना निर्मिती करून दृकसंवाद साधू पाहतात.



        दृश्य घटकांचा  एकत्रित सम्पूर्ण दृक अनुभव, हा मानवाच्या एकंदरीत इंद्रिय दृश्य अनुभवाच्या संदर्भात पाहतांना, दृश्य जाणिवेचा अनुभव हा संवेदन ज्ञान ग्रहणाच्या विशिष्ठ काळातील मानवीय नेणिवांच्या संचिताचा महत्वपूर्ण भाग होताना दिसतो. तो नेणिवांचा भाग अनुभवताना, अनुभवाचे भान ठेवून अनुभवल्यास. प्रत्येक कला - कृती (चित्र) हे फक्त दृश्यसंदर्भ अर्थासाठीच चित्र म्हणून महत्वपूर्ण ठरते. तेव्हा चित्र -शिल्प यांचे अवकाश किंवा पृष्ठभाग हा दृश्य नेणीवेच्या अवकाशात येण्या - जाण्याचा दृश्यमार्ग म्हणूनच राहतो. तेथूनच नेमकेपणानं कलारसिक प्रेषक आणि सृजनकर्ता प्रवेश करतो. तेव्हा एखादी अवस्था, कला, चित्र, वस्तु - वास्तु ही निमित्त मात्र राहते. तेथेच कलेचा अनुभव येतो.


        अशोक यांच्या चित्रांचे एक अंग अवकाशीय आहे, तर दुसरे अंग हे आकारीक आहे. रंग हा घटक अवकाश आकार संदर्भात आस्तित्वाच्या प्रकाशिय रुपात वावरतो. हा दृश्य प्रत्यय त्यांच्या चित्रांतून दिसून येतो.

        पुनरावृत्ती ही एक आदिम नैसर्गिक घटना आहे. ती अशोक यांच्या चित्रांची ही  प्रकृती आहे. तरीही चित्रातील आकार, घाट, स्वतंत्र राहातात. यांचा प्रत्यय प्रत्येकाला येतो. यांचे भान यावे म्हणून मानवाने चित्र, शिल्प, संगीत . चे सृजन केले आहे.

        कोणतीही पुनरावृत्ती ही बेहोशी (unconsciousness) आणते. यांचे भान (awarenss) ठेवल्यास मदहोशी प्रकट होते. याच दृश्य अनुभवाचे भान ठेवून, अशोक यांची  चित्र पाहिल्यास त्यांच्या चित्रांतून तसा प्रत्यय येतो. तेव्हा सम्पूर्ण चित्र अवकाशात भासमय दृश्य मदहोश पूर्ण भावात व्यक्त होताना जाणवू लागते. तिथेच जे फक्त उरते ते केवलदृश्य होय.

        त्यांच्या चित्रांतील छोट्या नाजूक रेषात्मक आकार एकत्र येवून, त्यातून नवीन आकारीक रचनाबंध निर्माण करतात. तेव्हा मूळ आकार हा नवीन आकार रचनेत सामावून जावून, चित्रांतील अवकाशात अंतराचा भास निर्माण करतात. तसाच मुळ आकाराचा संबंध अथवा संदर्भ हा आकारीकतेचा मुलार्थ बदलवून पोत रचनेच्या एका विशिष्ठ काळाच्या जाणिवेचा दृश्य बोध करून देतो. चित्रांतील हालचाल, वेग, आवेग, जैविक भूमीतीचा दृश्यभास निर्माण करतात. त्यामुळे अवकाश, आकार, प्रकाश या त्रयीच्या संयोगातून दृश्यसृजन होताना दिसते. म्हणून अशोक यांच्या चित्रांत तरल पारदर्शी दृश्य संगीताचा प्रत्यय आल्यावाचून राहत नाही.
        'कला' ही बहुआयामी असून तिचे 'रूप' एक आहे.

कलेची कृती कलाकृती (चित्र) नेहमी काळाच्या कलेत अनेक पुनरावृत्तीच्या रुपातच स्वतंत्रपणे व्यक्त होत राहते.




हंसोज्ञेय तांबे.
hansodnya @ gmail.com




1 comment:

  1. Khupach sunder lekh..Abhinandan ashok aani tambe siranche
    .

    ReplyDelete

Thanks for comment JK